जनजागृतीद्वारे दीड क्विंटल ई-कचऱ्याचे केले संकलन

 दिव्यांग विद्यार्थिनी भूमी, स्व. पोंक्षे गुरुकुल प्रशालेत संगणक भेट


 तुरुतीनंतर वापरायोग्य १30 लॅपटॉप, संगणक दान करणार; नंदुरबारातून उपक्रमाला प्रारंभ 


नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान सुरू करण्यात आले होते. शहरातील विविध भागांसह शाळा, महाविद्यालये अशा ६५ ठिकाणी जनजागृती करून तब्बल दीड क्विंटलपेक्षा जास्त ई-कचरा संकलित करण्यात यश आले.
या विषयाचा अधिक व्यापक प्रमाणात अभ्यास करण्याच्या हेतूने नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी डी. आर. हायस्कूलमध्ये करण्यात आले. प्रमुख संवादक म्हणून भूमिका मांडताना पूर्णम इको व्हिजन फाउंडेशन, पुणे या पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचे सीईओ डॉ. राजेश मणेरीकर यांनी अनेक मुद्दे अधोरेखित केले. यात पुनर्वापराची संस्कृती लुप्त होत चालल्यामुळे कचरा निर्मिती प्रचंड वाढली, कचऱ्याचे व्यवस्थापन, विलगीकरण आणि विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नाही, परिणामी त्याचे आरोग्य, वातावरण आणि जमिनीच्या सकसतेवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट यातच त्याचा उपाय दडलेला आहे. या सर्व प्रक्रियेमुळे रोजगारनिर्मिती, शाश्वत उत्पन्न आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाण्यास मदत होते. घरातील ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग घरातच केल्यास कचरा वाहून नेण्याचा खर्च वाचतो, परसबागेत नैसर्गिक खत निर्मिती होते आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही आपण हातभार लावू शकतो असे त्यांनी अधोरेखित केले. योजक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. गजानन डांगे यांनी विकसित नंदुरबार @ २०५० उपक्रमाच्या आतापर्यंतच्या कामाची संवाद फलश्रुती काय झाली, त्याबाबत अवगत केले. कौन्सिलचे समन्वयक आशिष वाणी आणि डी.आर. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज पाठक प्रमुख म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख प्रा. श्रीराम दाऊतखाने यांनी केले. 


दिव्यांग विद्यार्थिनी भूमी, स्व. पोंक्षे गुरुकुल प्रशालेत संगणक भेट


पूर्णमचे प्रकल्प व्यवस्थापक सुभाष अंभोरे यांनी पूर्णम आणि ई-यंत्रण उपक्रमाची माहिती दिली. ई-यंत्रण उपक्रमात २० शहरातून २४ टन ई कचरा गोळा झाला. यात जवळपास १५ लाख लोक, १४० शाळा, ९१ संस्था, आणि २७०० स्वयंसेवक जोडले गेले. तर दुरुस्त केलेले वापरायोग्य १३० लॅपटॉप, संगणक वगैरे दान करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात नंदुरबारमधून करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनी भूमी आशिष सोनार हिला आणि लोकवर्गणीतून कार्य करणाऱ्या स्व. विवेक पोंक्षे गुरुकुल प्रशालेला प्रत्येकी एक संगणक भेट म्हणून देण्यात आले. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.