शाडू माती दान मोहिमेला झाली सुरुवात

शाडू माती दान मोहिमेला झाली सुरुवात


पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित पीएमसी केअर वेब ॲपवर 'पुनरावर्तन' संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेली 'शाडू माती दान' ही सुविधा विकसित करून देण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाले. 

महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी मंगेश दिघे, पुनरावर्तनच्या संस्थापिका मनीषा शेठ, पूर्णम इकोव्हिजनचे संस्थापक राजेश मणेरीकर, पीएमसी केअर टीमचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या पीएमसी केअर ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमुळे गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती विसर्जनानंतर त्यांची माती दान करण्यासाठी नागरिकांना यावर नोंदणी करता येणार आहे. तसेच जिओ प्रॉक्सिमिटी तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिकांना त्यांच्याजवळील माती दान करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे शोधता येणार आहेत. गेल्यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी ४२ हजार किलो शाडू माती संकलित करण्यात आली होती. पुनरावर्तन मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.